टोमॅटो लागवड
टोमॅटो
टोमॅटो लागवड, टोमॅटोचे महत्व, टोमॅटो खते नियोजन, टोमॅटो रोग माहिती, टोमॅटो फवारणी
शेतकरी बांधवांनो जसेकी आपल्याला माहीतच आहे की टोमॅटोचे रोजच्या आहारात किती महत्व आहे. तसेच भाजीपाला पिकामध्ये टोमेटोला महत्वाचे स्थान आहे. आपल्या राज्याचे हवामान या पिकास अनुकूल असून जमीन, पीक ( वान ), हवामान, पाणी, खत तसेच पीक संरक्षण व कीड आणि रोगाचे वेळीच नियोजन केल्यास टोमॅटोचे उत्पादन प्रती हेक्टर ६० ते ७० टीन पर्यंत सहज वाढू शकते.
शेतकरी बांधवांनो आताच्या परिस्थिति नुसार वातावरणात सतत होणार्या बदलामुळे टोमॅटो पिकावर रोग व किडींचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव आढळून येतो. बर्याचदा अश्या परिस्थितीमध्ये शेतकरी बांधवांना आपला उभा टोमॅटोचा प्लॉट ( फड ) करपून जातांना पहावा लागतो. या मागील कारण वातावरन हे असुशक्ते परंतु रोगाबद्दल आणि किडीबद्दल अपुरी माहिती तसेच चुकीच्या फवारन्या हे देखील कारण असू शकते. ( दोन्ही शक्यता नाकारता येत नाही.) 🙏 म्हणूनच शेतकरी बांधवांनो कुठल्याही पिकावर लागणारी कीटकनाशके, बुरशीनाष्के तसेच पिकाच्या अवस्ते नुसार लागणारी खते तसेच संजीवके यांच्या बद्दल माहिती करून घेणे आवश्यक आहे. खरेतर काळाची गरज आहे.🙏
टोमॅटोचे महत्व
टोमॅटोचा वापर जसा रोजच्या आहारामध्ये होतो तसाच बरेचसे प्रक्रियायुक्त पदार्थ बनवण्यासाठीसुद्धा होतो. त्यामध्ये टोमॅटो केचअप, टोमॅटो सूप, टोमॅटो सॉस, टोमॅटो चटणी इ. पदार्थ बनवता येतात. यामुळेसुद्धा चांगल्या प्रतीचे टोमॅटो उत्पादन केल्यास आर्थिक नफा होऊ शकतो. टोमॅटोवर आधारित प्रक्रिया उद्योगांना राज्यातच नव्हे तर देशातही मोठा वाव आहे. टोमॅटो हे एक संरक्षक अन्न असून टोमॅटोमधील लयकोपिन या अल्कलाईड रंगद्रव्यामुळे शरीरातील पेशी मरण्याचे प्रमाण हे कमी होते. टोमॅटो हे फळ आहारच्या दृष्टीने आरोग्यासाठि फायदेशीर आहे.
टोमॅटो खते नियोजन
टोमॅटोची लागवड करत असतांना खत नियोजन हे फार महत्वाचे आहे. टोमॅटो लागवडीसाठी रेताड, मध्यम, काळी उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी. तसेच अति हलकी, क्षारयुक्त, चोपण, पाणथळ जमिनीत या पिकाची लागवड करू नये. साधारण जमिनीचा सामु साडे सहा ते सात असावा. टोमॅटोमध्ये खत व्यवस्थापन करत असतांना माती परीक्षण करून योग्य प्रमाणात खते वापरावी यामध्ये नत्र, स्फुरद व पालाश या खतांच्या व्यतिरिक्त कॅल्शियम, मॅग्नेशीयम, गंधक आणि याच बरोबर दुय्यम अन्नद्रव्ये तसेच जस्त, लोह, बोरॉन, मॅगनीज व तांबे इ. सूक्ष्म अन्नद्रव्य जमीन व पिकानुसार आवश्यकतेनुसार वापरावे.
१ ) टोमॅटो सेंद्रिय खतांचा वापर :-
टोमॅटोमध्ये सेंद्रिय खत वापरायचे असल्यास प्रती हेक्टरी २५ टन चांगले कुजलेले शेणखत व २०० किलो निंबोळी पेंड यांचा वापर करावा.
२ ) टोमॅटोमध्ये रसायनिक खते :-
टोमॅटोची लागवड जर मध्यम प्रकारच्या जमिनीमध्ये तसेच संकरीत वानासाठी हेक्टरी ३०० किलो नत्र, १५० किलो स्फुरद आणि १५० किलो पालाश वापरावे. त्याचप्रकारे सुधारित व सरळ वाणसाठी हेक्टरी २०० किलो नत्र १०० किलो स्फुरद आणि १०० किलो पालाश यांचा वापर करावा. या व्यतिरिक्त संकरीत, सुधारित व सरळ वनासाठी हेक्टरी २५ किलो फेरस सल्फेट , २५ किलो मॅगनिज सल्फेट, ५ किलो बोरॉन व २५ किलो मॅग्नेशियम सल्फेट वापरावे.
खते देतांना निम्मे नत्र, संपूर्ण स्फुरद व पालाश लागवडीच्या वेळी वापरावे. राहिलेले निम्मे नत्र १५, २५, ४०, ५५ दिवसांनी समान हप्त्यामध्ये विभागून बांगडी पद्धतीने झाडाच्या बुंध्यापासून ४ बोटांच्या अंतरावर मुळ्यांच्या क्षेत्रात माती आड करून द्यावे. तसेच खते दिल्यानंतर लगेच पाणी द्यावे याशिवाय सूक्ष्म व दुय्यम अन्नद्रव्य लागवडीपासून ५ ते ७ दिवसांनी देण्यास सुरुवात करावी.
३ ) जैविक खते :-
जैविक खतांचा वापर करत असतांना एकरी २ किलो अँझक्टोबॅक्टर २ किलो स्फुरद विरघळविणारे जिवाणू व २ किलो पालाश विरघळविणारे जिवाणू हे सर्व एक टन शेणखतामध्ये मिसळून वापरावे.
टोमॅटो रोग माहिती
टोमॅटो या पिकावर पांढरी माशी, फुलकिडे, नाग आळी व फळे पोखरणारी आळी या किडींचा प्रादुर्भाव आढळतो. या बरोबर अर्ली ब्लाईट, लेट ब्लाईट ( लवकर व उशिरा ) येणारा करपा, बोकडा, ( पर्णगुच्छ ) फळसड, मर, भुरी, स्पॉटेड विल्ट व्हायरस इ. रोगांचा प्रादुर्भाव प्रामुख्याने आढळतो. यांची लक्षणे व उपाय सविस्तर जाणून घेऊ.
टोमॅटोवरील कीड
१ ) पांढरी माशी :-
टोमॅटो या पिकावर सुरवातीला या किडीचा प्रादुर्भाव दिसून येतो. पांढरी माशी पानातील अन्नरस शोषून घेते त्यामुळे पिकाची पाने पिवळी पडतात. ही कीड पानांंतील रस शोषण करण्या सोबतच पारदर्शक द्रव पदार्थ टाकतात. त्या द्रवामुळे पानांवर काळी बुर्शी येते. त्यामुळे पिकाची वाढ कमी होते आणि उत्पादन कमी येते. या किडीच्या प्रादुर्भावामुळे लिफ कर्ल या रोगाचा देखील प्रसार होतो. म्हणून या किडीचा वेळीच बंदोबस्त करावा.
फवारणी / उपाय :-
पांढर्या मशीच्या नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रिड ४ मि. लि. किंवा डायमेथोएट १० मि. लि. किंवा मिथिलडिमेटॉन १० मि. लि. प्रती १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. याच बरोबर शेतामद्धे पिवळे आणि निळे चिकट सापळे लावावेत यामुळे देखील रसशोषन करणार्या किडीचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत मिळते.
२ ) फुलकिडे :-
फुलकिडे ही देखील रसशोषण करणारी किड आहे. फुलकिडे हे पानातील अन्नरस शोषून घेतात त्यामुळे पाने पांढरी होतात तसेच वाकडी तिकडी होतात. या किडीमुळे स्पॉटेड विल्ट व्हायरस या विषाणूमुळे होणार्या रोगाचा प्रसार होतो.
फवारणी / उपाय
शेतामद्धे या किडीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास याकिडीच्या नियंत्रणासाठी डायमेथोएट १० मि. लि. किंवा इमिडाक्लोप्रिड ४ मि. लि. किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रिन ५ ते ७ मि. लि. किंवा मिथाईल डिमेटॉन १० मि. लि. १० लीटर पाण्यात निसळून फवारणी करावी.
३ ) नाग आळी :-
नाग आळीची माशी हि अगदी लहान असून ती सहजा सहजी निदर्शनास पडत नाही परंतु तिच्या आळीमुळे प्रादुर्भाव झालेलि पाने हि मोठ्या प्रमाणात दिसू लागतात. या किडीची आळी हि पानाच्या वरील पापुद्रयाखाली राहून त्यामधील हिरवा भाग पोखरून खातात व खातपुढे सरकते. त्यामुळे हि आळी जशी पुढे सरकते तशा पानांवर पांढर्या नागमोडी रेषा पडलेल्या दिसतात. नाग आळीच्या पानांवरील प्रादुर्भावामुळे पानांच्या अन्नतयार करन्याच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो आणि उत्पन्न कमी होते.
फवारणी / उपाय
पिकामध्ये हि किड आढळून आल्यास सायपरमेथ्रिन ५ मि. लि. किंवा डेल्टामेथ्रिन ४ मि. लि. किंवा फिप्रोनील १५ मि.लि. १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
४ ) फळे पोखरणारी आळी
या किडीचा मादी पतंग हा पानांवर तसेच फुलावर अंडे घालतात. अंड्यातून आळी बाहेर पडल्यानंतर कोवळी पाने खावून वाढते व कालांतराने फळे आल्यावर फळे खावू लागते. हि आळी फळाला छिद्र पडून पुढील अर्धे शरीर फळात ठेवून फळ खाते. त्यामुळे फळे सडतात. जानेवारी ते मे दरम्यान या आळीचा प्रादुर्भाव जास्त असतो.
फवारणी / उपाय
या आळीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास डेल्टामेथ्रिन ५ मि. लि. किंवा मिथाईल डेमॅटॉन (२५ टक्के प्रवाही) १५ मि. लि. किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रिन ५ ते ७ मि. लि. प्रती १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच या किडीचा फळांवरील प्रादुर्भाव कमी करण्यासाठी कामगंध सापळ्यांचा वापर करावा. कामगंध सापळ्यांच्या वापरामुळे किड बर्याच प्रमाणात आटोक्यात येते.
टोमॅटोवरील रोग
१ ) लवकर येणारा करपा ( अर्ली ब्लाईट )
टोमॅटो पिकावर लवकर येणारा करपा अल्टरनेरीय सोलाणी या नावाच्या बुरशीमुळे हा रोग होतो. लवकर येणार्या करप्याची लक्षणे प्रथम जुन्या पानांवर तसेच फांद्यां आणि फळांवर दिसतात. यामध्ये सुरवातीला राखाडी ते तपकिरी रंगाचे ठिपके पानांवर येतात नंतर ते हळूहळू केन्द्रित होतात व वाढू लागतात, या डागांभवती ठळक पिवळी कडा असते. यारोगाचा प्रादुर्भाव जसजसा वाढू लागतो तसे पूर्ण पान पिवळे होवून गळून पडते, त्यामुळे पानगळ मोठ्या प्रमाणात होते. तसेच केंन्द्रित डाग हे फांद्यावर तसेच फळांवरती दिसू लागतात.
फवारणी / उपाय
पिकामध्ये या रोगाची लागण होवू नये यासाठी लागवडीच्या वेळी जमिनीमध्ये प्रती एकरी २ किलो ट्रायकोडर्मा पावडर चांगल्या कुजलेल्या शेणखतामध्ये मिसळून द्यावे. शेतामध्ये या रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास किंवा रोगाची लक्षणे दिसताच मॅनकोझेब २५ ग्रॅम आणि टेब्यूकोनॅझोल ५ मि. लि. या बुरशी नाशकाची प्रती १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी किंवा मॅनकोझेब २५ ग्रॅम किंवा कॉपरऑक्झिक्लोराईड २५ ते ३० ग्रॅम किंवा क्लोरोथॅलोणील २५ ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करवी.
२ ) उशिरा येणारा करपा ( लेट ब्लाईट )
टोमॅटो पिकावर उशिरा येणारा करपा फायटोप्थोरा इन्फेस्टन्स या नावाच्या बुरशीमुळे हा रोग होतो. उशिरा येणार्या करप्याची लक्षणे पानांच्या वरच्या बाजूच्या कडेने थोडेसे तपकिरी हिरवे ठिपके येतात. कालांतराने हे ठिपके ( एकत्र येवून ) एकमेकात मिसळून पानांचा मोठा भाग तपकिरी रंगाचा होतो. या रोगाचा प्रादुर्भाव जस जसा वाढत जाईल त्या प्रमाणात पाने तपकिरी होवून गोळा झालेली दिसू लागतात. त्याच प्रमाणे ओल्या वातावरणात पानाच्या खालच्या बाजूने असलेल्या ठिपक्यावर राखाडी ते पांढर्या बुरशीची लागण होते ज्यामुळे आपल्याला निरोगी भाग व सुकलेल्या भागातील फरक सहज लक्षात येतो. फळावर हा रोग राखाडी हिरवे ते मळकट तपकिरी रंगाच्या आणि सुकलेल्या डागाच्या स्वरुपात दिसतो. या डागाजवळील फळांचा गरहा कडक होतो.
फवारणी / उपाय
रोगाची लक्षणे दिसताच मॅनकोझेब २५ ग्रॅम आणि टेब्यूकोनॅझोल ५ मि. लि. या बुरशी नाशकाची प्रती १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी किंवा मॅनकोझेब २५ ग्रॅम किंवा कॉपरऑक्झिक्लोराईड २५ ते ३० ग्रॅम किंवा क्लोरोथॅलोणील २५ ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करवी. या बुरशीनाशका व्यतिरिक्त मेटॅलॅक्झील एम झेड - ७२ किंवा फोसेटील ए. एल २५ ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
३ ) पानावरील ठिपके
टोमॅटो पिकावर पानावरील ठिपके सेप्टोरिया लायकोपेरसिसा या नावाच्या बुरशीमुळे येतात. या रोगाची लक्षणे खालून वर म्हणजे जुन्या पानांकडून नवीन कोवळ्या पानांपर्यंत पसरतात. या रोगाचे पानांवर बारीक पाणी शोषलेले गडद तपकिरी कडा असलेले राखाडी रंगाचे गोलाकार ठिपके जुन्या पानांनवर खालच्या बाजूला उमटतात. या रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यास डाग मोठे होतात व एकमेकात मिसळतात आणि त्यांच्या केंद्रात काळ्या रंगाचे ठिपके दिसू लागतात. खोडावर व फुलांवर याच पद्धतीचे लक्षणे दिसून येतात. जास्त प्रादुर्भाव झालेली पाने फिकट पिवळी होतात आणि वाळून गळतात, पानांची गळ झाल्यामुळे फळे उन्हात करपतात. या रोगाचा प्रादुर्भाव फळांवर फार कमी म्हणजे कधीतरी दिसून येतो.
फवारणी / उपाय
या रोगाची लक्षणे दिसताच मॅनकोझेब २५ ग्रॅम किंवा कॉपरऑक्झिक्लोराईड २५ ते ३० ग्रॅम किंवा क्लोरोथॅलोणील २५ ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करवी.
४ ) पर्णगुछ किंवा बोकडा ( लिफ कार्ल )
आपण ज्याला बोकडा किंवा पर्णगुछ म्हणतो तो एक विषाणूजन्य रोग आहे. हा रोग टोबेको लीफकर्ल व्हायरस या विषाणू मुळे होतो. या रोगामुळे पाने वाकडी होतात व झाडाची वाढ खुंटते तसेच पाने पिवळी पडतात. झाड खुजे राहून पर्णगुछासारखे दिसते. त्यामुळे झाडाला फुले व फळे लागत नाही. किंवा लागलेच तर त्यांचा आकार लहान राहतो. या रोगाचा प्रसार हा पांढर्या मशीमुळे लवकर होतो.
फवारणी / उपाय
या रोगाची लागण पिकाच्या सुरवातीच्या अवस्थे मध्ये जास्त प्रमाणात आढळत असल्या मुळे रोपांवर डायमेथोएट किंवा मिथाईल डिमेटॉन १० मि. लि. प्रती १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच रोपांची लागवड करत असतांना इमिडाक्लोप्रिड १० मि. लि. किंवा कार्बोसल्फान २० मि. लि. + ट्रायकोडर्मा पावडर ५० ग्रॅम प्रती १० लीटर पाण्यात मिसळावी व या द्रावणात रोपांची मुळे १० मिनिटे बुडवून लावावी. तसेच लागवडी नंतर १५ दिवसांच्या अंतराने रसशोषण करणार्या किडींसाठी कीटकणाषकाची फवारणी करावी.
५ ) फळ सड ( बक आय रॉट )
हा रोग फायटोप्थोरा निकोशियाना पॅरासिटिका व फायटोप्थोरा कॅपसीसी या बुरशी मुळे होतो. या बुरशीमुळे बक आय रॉट हा रोग होतो. यारोगामुळे फळावर बदकाच्या डोळ्याच्या आकाराचे तपकिरी रंगाचे वलय दिसतात अशी वलये नंतर सडतात.
फवारणी / उपाय
या रोगाची लागण होताच झाडावरील तसेच जमिनीवर पडलेली रोगग्रस्त फळे, पाने गोळाकरून बांधावर किंवा टोमॅटो प्लॉटच्या शेजारी न टाकता त्यांना जमिनीत गडावीत किंवा जाळून नष्ट करावीत. तसेच मेटॅलॅक्झील एम झेड - ७२ किंवा फोसेटील ए. एल २५ ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
७ ) मर
मर हा रोग फुजारियम व व्हरटीसेलियम या बुरशीमुळे होतो. फुजारियम या बुरशीमुळे रोगग्रस्त झालेली रोपे किंवा झाडे पिवळसर होवून अचानक वाळतात. तसेच व्हरटीसेलियम या बुरशीमुळे रोगग्रस्त झालेली रोपे किंवा झाडे खालून वर पिवळसर होत जातात व गळून पडतात.
फवारणी / उपाय
या रोगाच्या नियंत्रणासाठी थायरम ३ ग्रॅम + मेटॅलॅक्झिल ६ ग्रॅम प्रती किलो बियाणे बिजप्रक्रिया करावी. तसेच लागवडीपूर्वी जमिनीत हेक्टरी ५ किलो ट्रायकोडर्मा चांगल्या कुजलेल्या शेनखतात मिसळून टाकावे. या रोगाची लक्षणे दिसताच बेनोमिल किंवा कार्बेन्डेझिम १० ग्रॅम १० लीटर पाण्यात मिसळून झाडांच्या मुळा भोवती ओतावे आळवणी ( ड्रिंचिंग ) करावी.
८ ) भुरी ( Powdery Mildew )
भुरी हा रोग लेव्हेलुला टावरीका या बुरशीमुळे होतो. या रोगामुळे पानाच्या खालच्या बाजूवर पांढरे चट्टे पडतात आणि त्यांचे प्रमाण वाढल्यास पानांची गळ होते. भुरी या रोगाचा प्रादुर्भाव फांद्या तसेच फळांवर सुधा होतो. यामध्ये सुरवातीला पानाच्या वरच्या बाजूला पिवळसर डाग दिसतात. नंतरच्या काळात या रोगामध्ये सुरवातीला पांढरी व नंतर राखाडी पिठासारखी पावडर पानांवर तसेच फांद्या व फळांवर पसरून त्यांना झाकून टाकते.
फवारणी / उपाय
भुरीच्या नियंत्रणासाठी डिनोकॅप किंवा ट्रायडेमॉर्फ किंवा ट्रायडीमिफॉन किंवा टेब्यूकोनॅझोल ५ टे १० मि. लि. / ग्रॅम १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
९ ) टोमॅटो स्पॉटेड विल्ट व्हायरस
टोमॅटोवर हारोग विषाणूद्वारे होतो. या रोगामुळे सुरवातीला शेंड्याकडील नवीन पानांवर प्रथम लहान, तांबूस काळसर चट्टे व ठिपके दिसतात. रोगाचे प्रमाण वाढल्यास काही ठराविक दिवसात कोवळी पाने करपून काळी पडतात. रोगामुळे झाड खुरटे राहते व झाडांना फुले व फळे लागत नाहीत. फळे लागलीच तर त्यांची वाढ पूर्ण होत नाही ते लवकर पिकतात रंगात बदल जाणवतो. शेवटी पूर्ण झाड वाळते.
फवारणी / उपाय
रोपांची लागवड करत असतांना इमिडाक्लोप्रिड १० मि. लि. किंवा कार्बोसल्फान २० मि. लि. + ट्रायकोडर्मा पावडर ५० ग्रॅम प्रती १० लीटर पाण्यात मिसळावी व या द्रावणात रोपांची मुळे १० मिनिटे बुडवून लावावी. हा रोग फुलकिडी मुळे होत असल्याने फुलकीडींचा वेळीच बंदोबस्त करावा.
🙏🙏 शेतकरी बांधवांनो माहिती शेअर जरूर करा 🙏🙏
🌾🌾जय जवान जय किसान🌾🌾
छान
ReplyDeleteधन्यवाद 🙏
ReplyDeleteNow share this post our farmer friend
ReplyDelete