हळद लागवड
हळद लागवड
शेतकरी बांधवांनो महाराष्ट्र राज्याच्या एकूण हवामानाचा जर विचार केला तर हळद हे पीक उत्तमरीत्या घेता येते. हळद हे देशातील मसाला पिकात एक प्रमुख व नगदी पीक आहे. निर्यातक्षम व गुणवत्तापूर्ण हळदीच्या उत्पादनासाठी पूर्व मशागती पासून ते हळद प्रक्रियेपर्यंत पिकाचे व्यवस्थापन काळजीपूर्वक करणे गरजेचे असते.
जमीन व व्यवस्थापन
हळद या पिकाच्या लागवडीसाठी मध्यम प्रतीची तसेच चांगला निचरा होणार्या जमिनीची आवश्यकता असते. नदीकाठच्या गाळाच्या जमिनीत तसेच सहा ते साडे सात सामु असलेल्या जमिनीत देखील हे पीक उत्तम येते. हळदीच्या लागवडीसाठी भारी काळी, चिकन, क्षारयुक्त आणि पाण्याचा निचरा न होणारी जमीन निवडू नये. अशा जमिनीत हळदीचे कंद चांगले पोसत नाहीत. व कंद कुजीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर आढळून येतो. सुरूवातीला जमिनीचे माती परीक्षण करून घ्यावे.
हळदीचे खत व्यवस्थापन
हळद हे एक कंद वर्गीय पीक असल्यामुळे हळदीला जास्तीत जास्त सेंद्रिय खतांचा वापर केल्यास उत्पन्न चांगले मिळते. त्यासाठी एकरी 25 ते 30 बैलगाड्या चांगले कुजलेले शेणखत वापरावे. जर शेणखत उपलब्ध नसेल तर गांडूळ खत, मळीचे खत इ. सेंद्रिय खतांचा वापर करता येतो. या व्यतिरिक्त रासायनिक खतांचा वापर करत असतांना त्यांचा संतुलित आणि योग्य वेळीच वापर करावा. हळद या पिकासाठी हेक्टरी १०० किलो नत्र ( युरिया ) , १०० किलो स्फुरद (सुपर) आणि १०० किलो पालाश ( पोटॅश ) या प्रमाणात रसायनिक खतांची शिफारस आहे. शिफारशीप्रमाणे संपूर्ण स्फुरद आणि पालाश लागवडीच्या वेळी दिले असेल. व नत्राचे २ समान हप्त्यात विभागून देण्याची शिफारस आहे. त्यातील पहिला हप्ता हळद लागवडीनंतर ४५ दिवसांनी तर दूसरा हप्ता भरणी करतेवेळी ( लागवडी नंतर १०५ दिवसांनी ) देण्याची शिफारस आहे. हळदीमध्ये भरणी करतेवेळी हेक्टरी २१५ किलो युरिया, २५ किलो फेरस सल्फेट द्यावे. याच बरोबर २ टन निंबोली पेंड द्यावी. भरणी करतांना खते दिल्यामुळे खते योग्यरित्या मातीत मिसळले जातात. ( भरणी करणे म्हणजे सरीमधील माती किंवा लागण केलेल्या दोन्ही गड्ड्यामधील मोकळ्या जागेमधील माती १.५ ते २ इंच शिपीच्या कुदळीने खोदून दोन्ही बाजूच्या गडड्यांना लावणे म्हणजे भरणी होय. ) हळद या पिकाची शाखिय वाढ पूर्ण झाल्यानंतर या पिकास कोणतेही नत्रयुक्त रसायनिक खत जसे युरिया इ. देवू नये. जर युरियासारखी खते दिली तर त्यामुळे हळदीची अतिरिक्त शाखिय वाढ होते. याचा परिणाम हळद पिकाच्या पुढील अवस्थानवर होतो.जसे की हळकुंड भरणे, हळकुंडाची जाडी आणि वजन वाढणे आणि लांबीवर परिणाम पडतो. हळदीमध्ये जर पोटॅशियम युक्त खतांची कमतरता असेल तर त्या ठिकाणी हेक्टरी १२५ किलो पांढरा पोटॅश द्यावा. पोटॅशमुळे हळकुंडाचे वजन वाढून हळकुंडांना चकाकी येते.
हळद पिकाच्या वाढीच्या अवस्था
हळद या पिकाच्या वाढीच्या प्रामुख्याने ४ अवस्था आहेत यामध्ये ० ते ४५ दिवस या कालावधीमध्ये हळद या पिकाची उगवण अवस्था पूर्ण होते. व हळदिस १ किंवा २ पाने येतात. ४६ ते १५० दिवसांमध्ये हळदीची शाखिय वाढ होते. या अवस्थेमध्ये हळदिला फूटवे येतात. तसेच हळदीला एकूण येणार्या पानांची संख्या याच अवस्थेमध्ये निश्चित होते. १५१ ते २१० या दिवसांमध्ये फुटव्यांपासून हळकुंडे फुटण्यास सुरुवात होते. २१० ते १७० या दिवसांमध्ये हळकुंडाची जाडी आणि वजन या अवस्थेमध्ये प्रामुख्याने वाढते. या अवस्थांमध्ये पिकाच्या अवस्थेनुसार नत्र, स्फुरद आणि पालाश यांची मात्रा कमी अधिक प्रमाणात लागते.
हळद पिकातील फर्टीगेशन ( ड्रिपद्वारे खत व्यवस्थापन )
कुठल्याही पिकाच्या अधिक उत्पन्नासाठी तसेच रसायनिक खतांच्या वापरावर होणारा अधिक खर्च कमी करण्यासाठी ठिबक सिंचन द्वारे विद्राव्य खते दिल्यास उत्पन्नात वाढ होते.हळद या पिकाचे जास्तीत जास्त उत्पन्न काढण्याच्या दृष्टीने ठिबक सिंचनद्वारे विद्राव्य खतांचा वापर केल्यास पिकाच्या गरजेनुसार खते देता येतात. ( जमिनीचे मातीपरीक्षण करून विद्राव्य खतांचा वापर करावा.) हळद या पिकावर एखादा अन्नघटक जास्त झाला किंवा एखादा अन्नघटक कमी झाला तरी त्याचा परिणाम लगेच पिकाच्या वाढीवर दिसून येतो. उदा. हळदीला जर नत्र हा घटक जास्त झाला तर हळदीची शाखिय वाढ खूप होते. आणि हळद ही काडावरती जाते. त्याचा परिणाम म्हणजे अशावेळी हळदीच्या कंदाची वाढ थांबते. हळदीचे फर्टीगेशन करतांना प्रामुख्याने युरिया, फॉस्फरिक अँसिड आणि पांढर्या पोटॅशचा वापर करावा. किंवा मार्केटमध्ये उपलब्ध असलेल्या १९: १९: १९ , १२: ६१ : ००, ००: ५२: ३४, आणि ००: ००: ५० इ. पाण्यात विरघळणार्या विद्राव्य खतांचा पिकवाढीच्या अवस्थेनुसार वापर करावा. हळद या पिकाला ड्रिपद्वारे खाते देण्यास सुरुवात लागवडीनंतर १५ दिवसांनी करावी.
हळद पिकातील अन्नद्रव्य कमतरतेची लक्षणे
मित्रांनो हळद या पिकावर ज्या प्रमाणे रोगाची लक्षणे दिसतात त्याच प्रमाणे अन्नद्रव्यांची कमतरता झाल्यावर सुधा काही लक्षणे दिसतात ती खालील प्रमाणे
१ ) नत्र :-
नत्राच्या कमतरते मुळे हळदीच्या रोपांची वाढ खुंटते, तसेच खालची जुनी पाने पिवळी पडतात आणि गळतात.
२ ) स्फुरद :-
स्फुरद या अन्नद्रव्याचा हळदीच्या पिकामध्ये मुख्यतः मुळी निर्मितीमध्ये मोलाचा वाटा आहे. स्फुरदाच्या कमतरतेमुळे मुळ्यांची वाढ थांबते. याचा परिणाम जुन्या पानांवर खालच्या बाजूला जांबळ्या छटेच्या स्वरुपात दिसतो.
३ ) पालाश :-
पालाश या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे हळदीच्या पानाच्या कडा करपतात तसेच टोके सुकतात.
४ ) कॅल्शियम:-
हळदीमध्ये प्रामुख्याने कॅल्शियमच्या कमतरतेमुळे शेंड्याकडील पाने पिवळी पडतात व सुरळी वेडी-वाकडी होतात.
५ ) मॅग्नेशियम :-
मॅग्नेशीयम च्या कमतरतेमुळे हळदीच्या पानांच्या शिरांमधील जागा पिवळी पडून पानांच्या शिरा गडद हिरव्या रंगाच्या होतात.
६ ) गंधक :-
गंधकाच्या कमतरतेमुळे हळदीमध्ये नवीन पाने पिवळी पडतात. तसेच मुळांची लंबी वाढते. व खोडाची जाडी कमी होते.
७ ) लोह :-
हळदीमध्ये लोहाचा परिणाम नवीन पानांवर आढळतो. यामध्ये नवीन पानांच्या शिरांमधील भाग पिवळा पडतो. लोहाची कमतरता अधिक झाल्यास संपूर्ण रोप पिवळे पडते.
८ ) जस्त :-
हळदीची पाने जाड व ठिसुळ बनतात. तसेच हळदीच्या पानांवर सर्वत्र तपकिरी रंगाचे ठिपके दिसतात. हळदीच्या पानांची झुपक्यामध्ये वाढ होते.
९ ) तांबे :-
यामध्ये हळदीची पाने कडेने पिवळी पडण्यास सुरुवात होते. आणि पानांची टोके वळतात, व पाने मलूल होऊन वाळून गळतात.
१० ) बोरॉन :-
बोरॉनच्या कमतरतेमुळे रोपाच्या शेंड्याची वाढ थांबते. पाने चाबकसारखी लांबट होतात.
११ ) मॉलीब्डेनम :-
हळदीच्या पिकाची जुनी पाने पिवळी पडतात. व पानांवर सर्वत्र तपकिरी रंगाचे ठिपके दिसतात. तसेच पानाच्या खालच्या बाजूने डिंकासारखा स्त्राव येतांना दिसतो. ( पिकामध्ये अन्नद्रव्याची कमतरता झाल्यास किंवा प्रमाण जस्त झाल्यास त्याचे परिणाम पानांवर फळांवर वेगवेगळ्या प्रकारे जाणवते. त्यासाठी योग्य सल्ला घेऊनच अन्नद्रव्यांची कमतरता भरून काढावी. )
हळद पिकावरील कीड व रोग
हळद या पिकामध्ये प्रामुख्याने कंदमाशी, पाणातील रस शोषन करणार्या किडी, पाने खाणार्या अळ्या, सूत्रकृमी, हुमणी इ. किडींचा प्रादुर्भाव होतो. यामध्ये कंदमाशी ही सर्वात महत्वाची कीड आहे. या किडिमुळे २५ ते ५० टक्क्यांपर्यंत नुकसान होऊ शकते.
हळदी वरील कीड व रोग नियंत्रण
कंदमाशी ही हळदीमधील प्रमुख नुकसान करणारि कीड म्हणून ओळखली जाते. कंदमाशी ही डासासारखी पण आकाराने मोठी व काळसर रंगाची असते. माशीचे पाय हे. तिच्या शरीरापेक्षा लांब असतात. कंदमाशी ही खोडाच्या बुंध्याजवळ किंवा उघड्या पडलेल्या कंदावर अंडी घालते. या अंड्यानमधून ५ ते ७ दिवसात लालसर रंगाच्या नवजात अळ्या बाहेर पडतात. ह्या अळ्या उपजीविकेसाठी कंदामध्ये शिरतात. कंदामध्ये अळ्या शिरल्याणे तेथे रोगकारक बुरशी व सूत्रकृमींचा प्रादुर्भाव सुरू होऊन कंद मऊ होतात, कंदांना पाणी सुटून ते कुजू लागतात. लांबलेल्या पावसाचे वातावरण हे कंदमाशीसाठी अधिक अनुकुल असते. ही कीड ऑक्टोंबर पासून ते पिकाच्या काढनिपर्यंत नुकसान करते. या किडीमुळे हळद पिकामध्ये ४५ ते ५० टक्के नुकसान होते. म्हणून या किडीचा वेळीच बंदोबस्त करावा.
उपाय :-
कंदमाशीच्या नियंत्रणासाठी उघडे पडलेले कंद मातीने झाकून घ्यावे. वेळच्यावेळी हळदीची भरणी करावी. हेक्टरी सहा पसरट भांडे ( मातीचे किंवा प्लास्टिकचे ) वापरुन प्रत्येक भांड्यात भरडलेले एरंडीचे २०० ग्राम बी घेऊन त्यात दीड लीटर पाणी मिसळावे. ८ ते १० दिवसांनी या मिश्रणातून विशिष्ट असा वास बाहेर निघू लागल्याने कंदमाश्या आकर्षित होऊन मरू लागतात. कंदमाशी दिसताच ५ टक्के क्वीनॉलफॉस किंवा १० टक्के कार्बारील २० किलो प्रती हेक्टरी धुरळावी व नंतर हलके पाणी द्यावे.
हुमणी :-
या किडीची आळी देखील नुकसानकारक असते हुमणीचे मादी भुंगेरे हे रोज एक याप्रमाणे अंडी घालतात. व १५ ते २० दिवसांनी आळी बाहेर पडते.अंड्यातून बाहेर पडलेल्या अळ्या काही दिवस सेंद्रिय पदार्थांवर जगतात. नंतर मुळे कुरतडतात. तसेच जास्त प्रादुर्भाव झालेल्या भागात कंदही कुरतडतात. हुमणीने मुळे कुरतडल्याने हळदीचे पीक पिवळे पडते, रोपे वाळू लागतात तसेच उपटल्यास सहज उपटून येतात.
उपाय :-
हुमणी कीडीच्या नियंत्रणासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन केल्यास नियंत्रण सुलभ होते. या किडीचे भुंगेरे संध्याकाळच्या वेळेला बाहेर पडतात. ते गोळा करून रॉकेल मिश्रित पाण्यात टाकून नष्ट करावे. हळद लागवडीनंतर या किडीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास ४ मी.ली. क्लोरोपायरीफॉस प्रती लीटर पाण्यात घेऊन त्याची आळवणी करावी. ( ड्रिंचिंग करावी ) या किडीच्या जैवीक नियंत्रणासाठी मेटॅरायझिम अँनसोपली या परोपजीवी बुरशीचा हेक्टरी ५ किलो या प्रमानात कुजलेल्या शेणखतात मिसळून वापर करावा.
हळदीचे कंद सडणे किंवा गडडे कुजणे :-
( कंदकुज म्हणजे रायझोम रॉट ) पिथिअम व फायटोपथोरा या बुरशीमुळे होतो. या बुरशीजन्य रोगामुळे हळद पिकाचे ३० ते ३५ टक्के नुकसान होते. या रोगामुळे पाने प्रथम कडेने वळतात, गड्डे मऊ व पाणी सुटल्यासारखे होतात. रोगाची लक्षणे कंदाच्या कोवळ्या फुटव्यांवर लवकर दिसून येतात. नवीन आलेल्या फुटव्यांची पाने ही पिवळसर तपकिरी रंगाची होतात व खोडाचा रंग तपकिरी काळपट होतो. रोगग्रस्त फुटवा ओढल्यास सहज हातामध्ये येतो. जमिनीतील कंद बाहेर काढून पाहील्यास तो पचपचीत ( नासलेला ) व मऊ लागतो त्याला दाबल्यास दुर्गंधीयुक्त पाणी बाहेर पडते. या रोगाला कारणीभूत जास्त झालेला पाऊस, भारी काळी कसदार व कमी निचरा होणारी जमीन पोशक असते.
उपाय :-
हळद लागवडीसाठी पाण्याचा निचरा होणारी जमीन वापरावी. हळद लागवड करत असतांना लागवडीचे कंद हे कार्बेन्डेझिम १५ ग्रॅम + ईकालक्स २० मी.ली. १० लीटर पाण्यात मिसळून त्यामध्ये कंद बुडवून लावावे. हा रोग येऊ नये म्हणून जैवीक बुरशिनाशक ट्रायकोडर्मा प्रती एकरी दोन ते अडीच किलो पावडर २५० ते ३०० किलो चांगल्या कुजलेल्या शेणखतामध्ये मिसळून जमिनीत पसरावे. रोगाची तीव्रता जास्त असल्यास कॉपर ऑक्सीक्लोराइड ५ ग्रॅम प्रती लीटर पाण्यात मिसळून हळदीच्या बुंध्याभोवती आळवणी करावी. तसेच कार्बेन्डेझिम ( ५० डब्ल्यु . पी. ) १ ग्रॅम किंवा मॅन्कोझेब २.५ ग्रॅम प्रती लीटर पाण्यात मिसळून आवश्यकतेनुसार फवारणी करावी. ( पावसाळ्यात शेतामध्ये चारी खोदून पाण्याचा निचरा करावा. तसेच शेतामध्ये पाणी साठू देऊ नये )
हळदीमध्ये पानांवरील ठिपके ( करपा / लीफ स्पॉट ) :-
करपा हा बुरशीजन्य रोग असून या रोगाचा प्रादुर्भाव सकाळी पडणारे धुके व दव असतांना मोठ्या प्रमाणात आढळतो. हा रोग कोलेटोट्रीकम कॅपसीसी या बुरशीच्या प्रादुर्भावामुळे होतो. या बुरशीमुळे पानांवर अंडाकृती, लंबगोलाकार तपकिरी रंगाचे ठिपके पडतात. असे पान सूर्याकडे धरून बघितल्यास ठिपक्यांमध्ये अनेक वर्तुळे दिसतात. या रोगाची तीव्रता अधिक वाढल्यास संपूर्ण पान करपते व वाळून गळून पडते. त्यामुळे कंदाची वाढ व्यवस्थित होत नाही.
उपाय :-
हळदीच्या पानांवर हा रोग आढळून आल्यास या रोगाच्या नियंत्रणासाठी मॅन्कोझेब ३० ग्रॅम किंवा कार्बेन्डेझिम १० ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सीक्लोराइड ३० ग्रॅम १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. वातावरणातील बदलांमुळे जास्त दिवस धुके राहिल्यास १५ दिवसाच्या अंतराने पीक हे ७ महिन्याचे होईपर्यंत बुरशीनाशकांची आलटून-पालटून फवारणी करावी ( एकाच औषधाचा फवारणीसाठी सतत वापर करू नये )
पानावरील ठिपके ( लीफ ब्लॉच ) :-
हा रोग टॅफ्रिना मॅक्युलंन्स या बुरशीमुळे होतो. हा रोग वातावरणातील आर्द्रता वाढल्यामुळे दिसू लागतो. या रोगामध्ये पानावर असंख्य लहान तांबूस रंगाचे गोलाकार ठिपके दिसून येतात पुढे त्या ठिपक्यांमध्ये वाढ होऊन संपूर्ण पान करपते या रोगामध्ये पानाच्या खालील भागावर मुख्य शिरेच्या बाजूने लालसर करड्या रंगाचे १ ते २ सें. मी. व्यासाचे ठिपके दिसतात. त्यामुळे पाने वाळतात या रोगाची सुरुवात जमिनी लगतच्या पानांवर होते व ती नंतर वरील पानांवर पसरते या रोगामुळे हळदीची पाने शेंड्याकडून पिवळी दिसायला लागतात.
उपाय :-
या रोगाच्या नियंत्रणासाठी कार्बेन्डेझिम १० ते २५ ग्रॅम किंवा मॅन्कोझेब १० ते २५ ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सीक्लोराइड २५ ग्रॅम प्रती १० लीटर पान्यात मिसळून प्रादुर्भावाचे प्रमाण बघून १०दिवसाच्या अंतराने आलटून पालटून फवारणी करावी. ( रोगग्रस्त पाने वेचून नष्ट करावी. तसेच शेतामध्ये स्वच्छता ठेवावी )
सूचना :- हळदीमध्ये आळवणी करत असतांना ( ड्रिंचिंग ) वाफसा असावा. आळवणी केल्यानंतर पिकाला थोडासा पाण्याचा तान द्यावा. फवारणी करत असतांना औषधांसोबत उच्च प्रतीचे स्टीकर १ मी. ली. प्रती लीटर या प्रमानात अवश्य वापरावे.
🙏🙏 ईतर शेतकरी बांधवांना शेअर जरूर करा 🙏🙏
Nice information.
ReplyDeleteNice information.
ReplyDeleteDhanywad
ReplyDelete