तूर लागवड | तूर लागवडी साठी जमीन | तुरीच्या सुधारीत जाती ( वान ) | तूर पेरणी कधी करावी | तूर बीज प्रक्रिया | तूर खत नियोजन | तुरीवरील किड व रोग

तूर लागवड | तूर लागवडी साठी जमीन | तुरीच्या सुधारीत जाती ( वान ) | तूर पेरणी कधी करावी | तूर बीज प्रक्रिया | तूर खत नियोजन | तुरीवरील किड व रोग

तुरी बद्दल थोडक्यात

                     शेतकरी बांधवांनो भारता मध्ये  तुरीची शेती करणार्‍या राज्यामध्ये अग्रगन्य राज्य म्हणजे आपला महाराष्ट्र आहे. तूर हे राज्यातील सर्वात प्रमुख डाळवर्गीय पीक असून याची लागवड सर्व भागामद्धे खरीप हंगामात अंतरपिक म्हणून बाजरी, कापूस, ज्वारी तसेच सोयाबीन या प्रमुख पिकांबरोबर केली जाते. तूर हेपिक डाळवर्गी असल्यामुळे यापिकाच्या मुळावरील असणार्‍या गाठीतील रायझोबियम या जिवाणूमुळे हवेतील नत्राचे फार मोठ्या प्रमाणात स्थिरीकरण होते. तसेच नत्रयूक्त रसायनिक खताची बचत देखील होते. तुरीच्या पिकाचे उत्पादन कमी होण्यामागील कारणांमध्ये मर रोग व शेंगा पोखरणार्‍या आळीचा प्रादुर्भाव तसेच पिकाला फुले व शेंगा लागण्याच्या काळात पाण्याची कमतरता. यामुळे तुरीच्या उत्पन्नात फार मोठी घट होते. याच बरोबर लागवडीसाठी चुकीच्या वाणांची निवड तसेच कीड व रोगांबद्दल अपुरी माहिती या कारणांमुळे देखील उत्पन्नत घट होते.

तूर लागवडी साठी जमीन

                       तूर पिकाच्या लागवडीसाठी पाण्याचा उत्तम निचरा होणारी तसेच मध्यम ते भारी जमिनीची निवड करावी. या पिकाची मुळे खोलवर जात असल्यामुळे भारी जमिनीत तुरीचे जास्त उत्पादन मिळते. लागवडी साठी जमीनीची निवड करत असतांना माती परीक्षण केलेले कधीही योग्य. कारण निवडलेल्या जमिनी मध्ये स्फुरद, कॅल्शियम व मॅग्निज या खनिजांची कमतरता नसावी. जमीन भुसभुशीत करावी. खोल मशागत केल्यामुळे पिकाची मुळे खोलवर जातात व झाडांची वाढ चांगली होते. या मुळे झाडाची अन्नद्रव्य शोषण्याची ताकतदेखील वाढते. तुरीच्या लागवडीसाठी चोपन तसेच क्षारयुक्त जमीन मानवत नसल्या मुळे अश्या जमिनीची निवड करू नये.

तुरीच्या सुधारीत जाती ( वान )

मराठवाडा कृषि विद्या पीठाने विकसित केलेले सुधारित वान

१ ) बी. डी. एन -२

                          बी. डी. एन -२ हा वान १५५ ते १६५ दिवसामध्ये तयार होतो. या तुरीच्या दाण्याचा रंग पांढरा असून हा वान हलक्या व पाण्याची सोय नसलेल्या ठिकाणी लागवडीसाठी निवडावा. या वानापासून प्रती हेक्टरी साधारण १४ ते १५  क्विंटल उत्पादन मिळते. या वाणाची तूर डाळीसाठी चांगली आहे.

२ ) बी. डी. एन ७०८ ( अमोल तूर )

                          बी. डी. एन ७०८ ( अमोल तूर ) हा वान १६० ते १६५ दिवसामध्ये तयार होतो. या तुरीच्या दाण्याचा रंग लाल असून हा वान देखील हलक्या मध्यम तसेच कोरडवाहु व संरक्षित पाणी देण्याची योग्य सोय नसलेल्या ठिकाणी लागवडीसाठी निवडावा. या वाणाची आणखीन विशेषता म्हणजे हा वान मर व वांझ या रोगास प्रतिकारक्षम आहे. या वानापासून प्रती हेक्टरी साधारण १६ ते १८  क्विंटल उत्पादन मिळते.

३ ) बी. डी. एन ७११

                          बी. डी. एन ७११ हा वान १५० ते १६० दिवसामध्ये तयार होतो. या तुरीच्या दाण्याचा रंग पांढरा असून ज्या ठिकाणी वार्षिक कमी पावूस काळ असणार्‍या तसेच हलक्या मध्यम व कोरडवाहु तसेच संरक्षित पाणी देण्याची योग्य सोय नसलेल्या ठिकाणी लागवडीसाठी निवडावा. या वाणाची आणखीन विशेषता म्हणजे हा वान देखील मर व वांझ या रोगास प्रतिकारक्षम आहे. या वानापासून प्रती हेक्टरी साधारण १५ ते २०  क्विंटल उत्पादन मिळते.

४ ) बी. डी. एन ७१६

                          बी. डी. एन ७१६ हा वान १६५ ते १७० दिवसामध्ये तयार होतो. या तुरीच्या दाण्याचा रंग लाल असून शेंगा हिरव्या रंगाच्या असतात. या वनाची लागवड ज्या ठिकाणी दोन तीन पाणी देण्याची सोय असेल अश्या ठिकाणी करावी. हा वान मर आणि वांझ या रोगास प्रतिकारक्षम आहे. या वानापासून प्रती हेक्टरी साधारण १८ ते २०  क्विंटल उत्पादन मिळते. या वाणाची तूर डाळीसाठी चांगली आहे.

५ ) बी. एस. एम. आर. ७३६

                         बी. एस. एम. आर. ७३६ हा वान १७० ते १८० दिवसामध्ये तयार होतो. या तुरीच्या दाण्याचा रंग लाल व टपोरा असून हा वान शेंगा पोखरणार्‍या किडीस कमी बळी पडतो तसेच मर व वांझ या रोगास प्रतिकारक्षम देखील आहे. या वाणाची लागवड कोरडवाहु, बागाईत व खरीप , रब्बी या हंगामात करता येते. परंतु या वानाला कळी अवस्थेत म्हणजे फुलोर्‍याच्या आधी पावसाचा खंड पडल्यास पाणी देणे आवश्यक आहे. तसे नकेल्यास उत्पन्नात भारी घट येते. या वनाचे कोरडवाहु क्षेत्रात साधारण हेक्टरी १४ ते १६ क्विंटल उत्पादन मिळते. तर बागायत क्षेत्रात साधारण १८ ते २२ क्विंटल हेक्टरी उत्पादन मिळते.

६ ) बी. एस. एम. आर. ८५३ ( वैशाली तूर )

                           बी. एस. एम. आर. ८५३ हा वान वैशाली या नावाने देखील ओळखला जातो. हा वान १६० ते १७० दिवसामध्ये तयार होतो. या तुरीच्या दाण्याचा रंग पांढरा असून दाणे टपोरे असतात. हा वान हलक्या ते मध्यम जमिनीत तसेच बागायत व ओलीताखालील क्षेत्रात लागवडीस योग्य आहे. हा वान मर आणि वांझ या रोगास प्रतिकारक्षम आहे. या वनाचे कोरडवाहु क्षेत्रात साधारण हेक्टरी १५ ते १६ क्विंटल उत्पादन मिळते. तर बागायत क्षेत्रात साधारण १८ ते २० क्विंटल हेक्टरी उत्पादन मिळते.

७ ) विपूला

                            विपूला हा वान १४५ ते १६० दिवसामध्ये तयार होतो. या तुरीच्या दाण्याचा रंग लाल असून दाणे मध्यम आकाराचे असतात. या वाणाची लागवड सलग तसेच अंतरपिक पद्धतीत लागवड केल्यास चांगले उत्पन्न मिळते. हा वान मर आणि वांझ या रोगास प्रतिकारक्षम आहे. या वाणापासू साधारण २४ ते २६ क्विंटल हेक्टरी उत्पादन मिळते.

८ ) पी. के. व्ही. ( तारा तूर )

                            पी. के. व्ही. तारा हा वान १७० ते १८० दिवसामध्ये तयार होतो. या तुरीच्या दाण्याचा रंग तांबडा असून दाणे जाड असतात. या वाणापासू साधारण १९ ते २० क्विंटल हेक्टरी उत्पादन मिळते. या वाणाची तूर डाळीसाठी चांगली आहे.

९ ) आय. सी. पी. एल ८७११९ ( आशा तूर )

                           आय. सी. पी. एल ८७११९ हा वान आशा या नावाने देखील ओळखला जातो. या तुरीच्या दाण्याचा रंग लाल असून दाणे टपोर्‍या आकाराचे असतात. या वाणाची लागवड विदर्भात जास्त प्रमाणात होते. हा वान उशिरा येतो याचा कालावधी १८० ते २०० दिवसामध्ये तयार होतो. हा वान मर आणि वांझ या रोगास प्रतिकारक्षम तसेच शेंग माशी व शेंगा पोखरणार्‍या अळीचा प्रादुर्भाव या वनावर कमी प्रमाणात आहे. या वाणापासू साधारण १८ ते २० क्विंटल हेक्टरी उत्पादन मिळते.

१० ) आय. सी. पी. एल ८७ 

                           आय. सी. पी. एल ८७ हा वान १२० ते १३० दिवसामध्ये तयार होतो. हा वान हळवा असून या वाणाची लागवड बागायती क्षेत्रावर दुबार लागवडीसाठी तसेच खोडव्यासाठी योग्य आहे. या तुरीच्या दाण्याचा रंग लाल असून या वाणापासू साधारण १८ ते २० क्विंटल हेक्टरी उत्पादन मिळते.

११ ) एकेटी ८८११

                            एकेटी ८८११ हा वान १४० ते १५० दिवसामध्ये तयार होतो. या तुरीच्या दाण्याचा रंग लाल असून दाणे मध्यम आकाराचे असतात. या वाणापासू साधारण १५ ते १६ क्विंटल हेक्टरी उत्पादन मिळते.

१२ ) राजेश्वरी

                            राजेश्वरी हा वान लवकरतयार होतो. हा वान १३० ते १४० दिवसामध्ये तयार होतो. या तुरीच्या दाण्याचा रंग लाल असतो. या वनाची लागवड सलग पेरणी व अंतरपीक पद्धती मध्ये फार चांगले उत्पादन मिळवून देतो. या वाणापासू साधारण २८ ते ३० क्विंटल हेक्टरी उत्पादन मिळते.

१३ ) आय. सी. पी. एल ८८६३ ( मारोती तूर )

                         आय. सी. पी. एल ८८६३ हा वान मारोती या नावाने ओळखला जातो. हा वान १६५ ते १७५ दिवसामध्ये तयार होतो. या तुरीच्या दाण्याचा रंग लाल असून दण्यांचा आकार मध्यम असतो. हा वान फ्युजेरियम  मर या रोगास प्रतिकारक्षम आहे. परंतु हा वान वांझ या रोगास मोठ्या प्रमाणात बळी पडतो. ( हा वान लागवडीस योग्य नाही.)

महाराष्ट्रात लागवडीसाठी शिफारस असलेले तसेच चांगले उत्पन्न देणारे वान

महाराष्ट्रात १) विपूला २) पी. के. व्ही. ( तारा तूर ) ३) आय. सी. पी. एल ८७११९ ( आशा तूर ) ४) आय. सी. पी. एल ८७ ५) एकेटी ८८११ ६) राजेश्वरी या वाणांची प्रामुख्याने शिफारस केली आहे.

पेरणी कधी करावी

                         समाधानकारक म्हणजे साधारण ८० ते १०० मि. मि. पाऊस झाल्यावर वापसा येताच तुरीची पेरणी करावी. तुरीच्या पेरणीला उशीर झाल्यास उत्पन्नात घट होते. यामुळे तुरीची पेरणी १५ जुलै पूर्वी संपवावी. पावसाचा अंदाज बघून धूळ पेरणी केल्या अधिक उत्पन्न मिळते. 

बीज प्रक्रिया

                        कोणत्याही पिकाच्या बियाण्यास बिजप्रक्रिया करून पेरणी केल्यास नंतर येणार्‍या रोगांच्या समस्या फार कमी होतात. तुरीवर येणार्‍या बुरशीजण्य रोगांच्या नियंत्रणासाठी पेरणी पूर्वी थायरम २ ग्रॅम किंवा बावीस्टीन २ ते ३ ग्रॅम प्रती किलो बियाण्यास चोळावे. याच बरोबर १० किलो बियाण्यास रायझोबियम जिवाणू संवर्धक २५० ग्रॅम चोळून व सावलीत वाळवून पेरणी केल्यास १५ ते २० टक्के उत्पादनात हमखास वाढ होते. तसेच पी.एस.बी. ( स्फुरद विरघळवीनारे जिवाणू ) २५० ग्रॅम प्रती १० किलो बियाण्यास लावल्यास जमिनीतील स्फुरद पिकाला उपलब्ध होते व याचा पिकाच्या वाढीवर चांगला परिणाम होतो व १० टक्के उत्पन्न देखील वाढते.  रायझोबियम जिवाणू संवर्धकांचा वापर केल्यामुळे पिकाच्या मुळावरील कार्यक्षम गठींच्या संखेत वाढ होते. गठींच्या संखेत वाढ झाल्यामुळे हवेतील नत्राचे स्थिरीकरण होवून पिकाला त्याचा फायदा होतो. तसेच नंतरच्या पिकाला देखील याचा फायदा होतो. ( टीप. जिवाणू संवर्धकांचा व रासायनिक बुरशी नाशकांचा वापर करायचा असल्यास रसायनिक बुरशी नाशके आधी वापरावे व नंतर शिफारशी प्रमाणे जिवाणू संवर्धकांचा वापर करावा. )

तूर खत नियोजन

                             तुरीचे सुधारित वान रसायनिक खतांना चांगला प्रतिसाद देत असल्या मुळे उत्पन्न वाढीसाठी खताचे योग्य नियोजन करणे व मात्र देणे गरजेचे असते. शेतामद्धे शेवटची कुळवणि करत असतांना ५ टन चांगले कुजलेले शेणखत किंवा शेंद्रिय खत किंवा कंपोस्ट खत कुळवणी आधी शेतात पासरल्यास ते जमिनीत चांगल्या प्रकारे मिसळले जाते. तुरीच्या पिकाची सुरवातीच्या काळात जोमदार वाढ होण्या साठी नत्राची गरज असते. यासाठी पेरणी करतांना २५ किलो नत्र व ५० किलो स्फुरद ( १२५ किलो डायअमोनियम फॉस्पेट ज्याला आपण डीएपी म्हणतो ) किंवा ५० किलो यूरिया व ३०० किलो सिंगल सुपर फॉस्फेट याचा प्रती हेक्टरी वापर करावा. याच बरोबर ५० किलो पालश ( म्युरेट ऑफ पोटॅश ) चा वापर केल्यास पिकाची रोगप्रतीकारक क्षमता वाढते. कोरड वाहू पिकामद्धे पीक फुलावर येत असतांना फक्त २ टक्के यूरिया फवारणी केल्यास फायदा होतो.

तुरीवरील किड व रोग

                            तुरीवर सुरवातीला रसशोषण करणार्‍या किडींचा प्रादुर्भाव आढळतो. उदा. मावा, फुलकिडे, तुडतुडे व पाने गुंडाळणारी अळी या व्यतिरिक्त शेंग अळी, शेंगा पोखरणारी पिसारी पतंगाची अळी, शेंगा वरील माशी या किडींचा आणि मर, वांझपणा , खोड कुज, तुरिवरील करपा व कॅकर या रोगांचा प्रादुर्भाव आढळून येतो.

तुरिवरील किड

१ ) रसशोषण करणार्‍या किडी

                           तुरीवर सुरवातीला रसशोषण करणार्‍या किडींचा प्रादुर्भाव आढळतो यामध्ये मावा, फुलकिडे, तुडतुडे व पाने गुंडाळणारी अळी यांचा प्रादुर्भाव जाणवतो.

फवारणी / उपाय

                           रस शोषण करणार्‍या किडींचा प्रादुर्भाव आढळून आल्यास डायमेथोएट १० मि. ली. किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रिन १० मि. ली. प्रती १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

शेंग पोखरणारी अळी ( घाटे अळी )

२ ) शेंग पोखरणारी अळी ( घाटे अळी )

                           शेंग पोखरणारी अळी सुरवातीला कोवळ्या कळ्या खाते नंतर अळी शेगांना छिद्र पाडते व शरीराचा एक तृतीयांश भाग शेंगात घुसवून आतील दाणे फस्त करते. शेंग पोखरणारी अळीचा पतंग फिकट तपकिरी रंगाचा असतो. व शेंग पोखरणारी अळी हिरवट, करडी, राखाडी, किंवा पोपटी रंगाची असते. या अळीच्या अंगावर समांतर लांबीच्या तुटक तुटक रेषा असतात. पूर्ण वाढ झालेली अळी साधारण २.५ ते ४.५ से. मी. लांबीची असते. ही अळी पीक फुलोर्‍यात असल्यापासून ते काढणी पर्यंत पिकाचे नुकसान करते.

फवारणी / उपाय

                          सुरवातीला या अळ्यांच्या बंदोबस्ता साठी तूर लागवड करत असतांना ज्वारी . सूर्यफूल यांचे काही बी मिसळून पेरणी करावी यापिकाच्या ताटावर पक्षी बसून अळ्या खातात. शेतामद्धे T आकाराचे पक्षी थांबे बांधावे. याव्यतिरिक्त शेंग पोखरणारी अळीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास क्विनॉलफॉस २० मि. ली. किंवा सायपरमेथ्रिन १५ मि. ली. किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रिन १० मि. ली. प्रती १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पीक ५० टक्के फुलोर्‍यात असतांना किंवा अळीचा प्रादुर्भाव जास्त असल्यास ईमामेक्टिन बेन्झोएट ५ ते ७ ग्रॅम किंवा क्लोरॅनट्रंनीलिप्रोल 3 मी.ली या कीटक नाशकाची प्रती १० लीटर पाण्यात मिसळून दुसरी फवारनि १५ दिवसानंतर करावी.

३ ) शेंगा पोखरणारी पिसारी पतंगाची अळी

                          या पतंगाची अळी हिरवट तपकिरी रंगाची असून अंगावर लहान लहान केस असतात. या अळीचे शरीर मध्ये फुगिर असते व दोन्ही टोकाकडे निमुळते होत गेलेले असते. ही अळी कोवळ्या शेंगा पोखरते व आतील दाणे खाते त्यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होते.

फवारणी / उपाय

                          शेंगा तयार होण्याच्या काळात या किडीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास क्विनॉलफॉस २० मि. ली. किंवा सायपरमेथ्रिन १५ मि. ली. किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रिन १० मि. ली. प्रती १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

४ ) शेंगा वरील माशी

                        शेंगा वरील माशीची अळी शेंगामद्धे बियाण्यात प्रवेश करून त्यावर उपजीविका करते. एक अळी तिचा जीवनक्रम एकाच शेंगामध्ये पूर्ण करते. या अळीने खाल्लेल्या दाण्यावर बुरशी वाढते व ते सडून जातात अशे दाणे खाण्यास व पेरण्यास उपयोगी पडत नाही. व उत्पादनात घट होते.

फवारणी / उपाय

                      शेंगा तयार होण्याच्या काळात या किडीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास डायमेथोएट १० मी. ली. किंवा क्विनॉलफॉस २० मि. ली. किंवा सायपरमेथ्रिन १५ मि. ली. किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रिन १० मि. ली. प्रती १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. प्रादुर्भाव जास्त असल्यास ईमामेक्टिन बेन्झोएट ५ ते ७ ग्रॅम प्रती १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

तुरिवरील रोग

१ ) तुरीवरील मर रोग

                       हा रोग जमिनीत राहणार्‍या फूजॅरियम ऑक्झिस्पोरम युडम या नावाच्या बुरशीमुळे होतो. या बुरशीमुळे सुरवातीला झाडाची पाने पिवळी पडतात व नंतर फांद्या वाळून संपूर्ण झाड वाळते. फुले येण्या आधी जर या रोगाचा प्रादुर्भाव झाला तर पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. या रोगामद्धे झाडाच्या मुळावर उभा छेद घेवून पाहिले असता आतील भाग तपकिरी काळ्या रंगाचा झालेला दिसून येतो.

फवारणी / उपाय

                     या रोगाचा प्रसार जमिनीतील रोगट झाडाच्या अवशेषा मधून पसरतो. या रोगाच्या बुरशीचे बीज रोगट झाडाच्या अवशेषावर ३ ते ४ वर्ष जीवंत राहतात. उन्हाळ्यात जमिनीची खोल नांगरट केल्यास उष्ण तापमानामुळे या बुरशीचे बीज नष्ट होतात. बियाण्यास लागवडी पूर्वी थायरम २ ग्रॅम किंवा कार्बेन्डेझिम २ ग्रॅम किंवा ट्रायकोडर्मा ५ ग्रॅम प्रती किलो बियाण्यास बीज प्रक्रिया करावी. तसेच मर रोगाला प्रतिकारक सुधारित वाणाची लागवडीसाठी निवड करावी.

२ ) तुरीवरील वांझपणा ( स्टरिलिटी मोझेक )

                      हा रोग विषाणूजन्य असून तो कोळी (एरिओफिड माईट) या किडी मुळे होतो. या रोगाची लागण झालेल्या झाडाची पाने लहान राहतात. झाडाची वाढ खुंटते  झाडे लहान रहातात व फांद्यांची संख्या जास्त असते.  पानांचा रंग गर्द हिरवा , फिकट हिरवा किंवा पिवळसर दिसतो. या रोगाची लागण रोप अवस्थेत झाल्यास अश्या रोपांना फुले किंवा शेंगा लागत नाहीत.

फवारणी / उपाय

                       शेतात रोगग्रस्त झाडे दिसताच उपटून नष्ट करावीत. याच बरोबर डायमेथोएट १० मी. ली. किंवा प्रोफेनोफॉस ५ मी. ली. प्रती १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच या रोगाला प्रतिकारक अश्या वनाचीच लागवडीसाठी निवड करावी. जास्त प्रादुर्भाव असल्यास १० दिवसाच्या अंतराने दुसरी फवारणी करावी.

३ ) खोड कुज

                       हा रोग जमिनीत आढळणार्‍या फायटोपथोरा ड्रेचसलेरी या नावाच्या बुरशीमुळे होतो. हा रोग जास्त दिवस रिमझिम पाऊस पडत राहिल्यास झपाट्याने पसरतो. या रोगामुळे झाडाचा वरचा भाग वाळून जातो. व रोग झालेल्या ठिकाणी झाडाचे खोड मोडते.

फवारणी / उपाय

                      सतत पाऊस असल्यास शेतामद्धे पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी तसेच पाण्याचा योग्य रीतीने निचरा करावा. रोगप्रतीकारक वाणाची लागवडीसाठी निवड करावी. बीज प्रक्रिया करूनच बियाण्याची लागवड करावी. तसेच तूर उगवून आल्यानंतर १५ दिवसांनी बुरशी नाशकाची १० दिवसाच्या अंतरणी २ फवारण्या कराव्या.

४ ) तुरिवरील करपा

                      हा रोग अल्टरनेरिया टेन्यसीमा या बुरशीमुळे होतो. या रोगाच्या प्रादुर्भावा मुळे झाडाच्या पानांवर ठिपके पडतात व पाने गळतात. तसेच तुरीच्या शेंगा व दाणे देखील काळपट पडतात. या रोगाचा प्रादुर्भाव झाडाच्या खालच्या पानांवर जास्त दिसून येतो.

फवारणी / उपाय

                      या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येताच कार्बेन्डेझिम १० ग्रॅम किंवा मॅनकोझेब २० ग्रॅम प्रती १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

५ ) कॅकर

                     हा रोग डिप्लोडिया कजानी या बुरशी मुळे होतो. तुरीवर या रोगाची लागण झाल्यावर झाडाचे खोड जमिनी जवळ जाड होते. व त्या भागाशेजारी दुय्यम मुळे फुटतात.

फवारणी / उपाय

                     या रोगाचा प्रादुर्भाव आढळून येताच कार्बेन्डेझिम १० ग्रॅम किंवा मॅनकोझेब २० ग्रॅम प्रती १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

🙏🙏  ईतर पिकाची माहिती हवी असल्यास कमेंट करून जरूर सांगा  🙏🙏

1 Comments

Post a Comment
Previous Post Next Post