मिरची वरील किड व रोग नियंत्रण
आज आपण मिरची वरील कीड व रोग याबद्दल जाणून घेवू. शेतकरी मित्रांनो बाजारात हिरव्या मिरचिस वर्षभर मागणी असते. तसेच भारतीय मिरचीला परदेशातूनही चांगली मागणी आहे. मिरचीमध्ये अ ब आणि क जीवनसत्व भरपूर प्रमाणात असल्याने मिरचीचा संतुलित आहारात समावेश होतो. तसेच मिरचीमध्ये फॉस्फर, कॅल्शियम आणि खनिज पदार्थ ही आढळतात. म्हणून मिरचीला रोजच्या आहारात महत्वाचे स्थान आहे. मिरचीमधील तिखटपणा व स्वाद या गुणामुळे मिरचीला मसाल्यामध्येही महत्वाचे स्थान आहे. मिरची या पिकाचा औषधी उपयोग सुधा होतो.
मिरची पिकाची लागवड व हंगाम
मिरची या पिकाची लागवड उन्हाळा, हिवाळा, पावसाळा या तीनही हंगामात करता येते. मिरचीला उष्ण व दमट हवामान मानवते मात्र अधिक तापमानात फुले आणि फळे गळतात त्यामुळे अशा वातावरणात जास्त काळजी घ्यावी लागते. मिरचीच्या लागवडी साठी खरीपामध्ये मे महिन्याच्या शेवटी ते जून पर्यन्त रोपे तयार करून त्या रोपांची लागवड जून जुलैत करता येते. रब्बीमध्ये लागवडीसाठी सप्टेंबर ते ऑक्टोंबर पर्यन्त रोपे तयार करून त्या रोपांची पुनर्लागवड ऑक्टोंबर मध्ये करता येते. उन्हाळी हंगाममध्ये नोव्हेंबर ते डिसेंबरमध्ये रोपे तयार करून पुनर्लागवड जानेवारी ते फेब्रुवारी मध्ये करता येते
हवामान व जमीन
मिरची पिकाची लागवड करत असतांना पाण्याचा उत्तम निचरा होणार् या व मध्यम ते भारी जमिनीत मिरचीचे पीक चांगले येते. मिरचीचे हलक्या जमिनीत पीक घ्यायचे असल्यास त्यामध्ये योग्य प्रमाणात शेंद्रिय खते वापरल्यास मिरचीचे पीक चांगले येते. ( पाण्याचा योग्य निचरा न होणार्या जमिनीत मिरचीचे पीक घेऊ नये.) पावसाळ्यात तसेच बागायती मिरचीसाठी मध्यम काळी तसेच पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी उन्हाळ्यामध्ये मिरची लागवडीसाठी मध्यम ते भारी जमिनीची निवड करावी. चुनखडी असलेल्या जमिनीतही मिरचीचे पीक चांगले येते.
खत व्यवस्थापन
मिरची पिकाला वेळेवर तसेच नियोजित खते दिल्यास पिकाची वाढ ही जोमदार होते. मिरचीच्या कोरडवाहु पिकासाठी प्रती हेक्टरी ५० किलो नत्र, ५० किलो स्फुरद आणि ओलिताच्या पिकासाठी प्रती हेक्टरी १५० नत्र, १२० किलो स्फुरद व १२५ किलो पालाश द्यावे. यापैकी स्फुरद आणि पालाश यांची पूर्ण मात्रा आणि नत्राची अर्धी मात्रा रोप लागवडीच्या वेळी द्यावी. नत्राची राहिलेली अर्धी मात्रा ही रोपांच्या लागवडी नंतर ३० दिवसांनी बांगडी पद्धतीने द्यावी. मिरची लागवडीच्या वेळी भेसळ डोस किंवा मिश्रखते उदा. १०;२६;२६ , १२:३२:१६ , २०:२०:०:१३, डी ए पी. या खतांचा व तसेच मायक्रोन्यूट्रंट चा वापर करता येतो.
मिरचीवरील कीड
मिरची या पिकावर रस शोषण करणारी कीड जास्त प्रमाणात आढळते. त्यापैकि फुलकिडे, तुडतुडे, पांढरी माशी तसेच कोळी व मावा या प्रमुख किडींचा प्रादुर्भाव आढळतो.
१ ) फुलकिडे ( thrips )
मिरचीवर फुलकिडे ( थ्रिप्स ) या कीटकांचा प्रादुर्भाव शेंड्यावर किंवा पानाच्या खालच्या बाजूला आढळून येतो. हे कीटक आकाराने अतिशय लहान म्हणजेच १ मीली. पेक्षा कमी लांबीचे असतात त्यांचा रंग हा फिकट पिवळा असतो. हे कीटक पानावर ओरखडे पडतात व त्यामधून निघणारा रस शोषून घेतात. त्यामुळे पाने वाकडी होतात व पानांच्या कडा ह्या वरच्या बाजूला वळतात आणि बारीक होतात. यालाच आपण चुरडा- मुरडा रोग असे म्हणतो. हे कीटक खोडातील देखील रस शोषून घेतात. त्यामुळे खोड कमजोर बनते व पानांची गळ होते.
उपाय : -
या कीडीच्या नियंत्रणासाठी डायमेथोएट ५०० मी. ली. ५०० लिटर पाण्यातून प्रती हेक्टरी फवारावे. किंवा निंबोळीअर्क ४ टक्के फवारावे. ( या किडीच्या चांगल्या नियंत्रणासाठी लागवडी पासून ३ आठवड्यांनी पिकावर १५ दिवसांच्या अंतराने शिफारशीप्रमाणे कीटक नाशकांचा आलटून पालटून वापर करावा. )
२ ) तुडतुडे (Jassid)
तुडतुडे हि कीड पानातिल रस शोषून घेते तसेच तुडतुडे आणि त्यांची पिल्ले पानाच्या खालच्या बाजूने राहून त्यातील रस शोषण करतात. या किडीचा जास्त प्रादुर्भाव झाल्यास पाने मुरगळतात व परिणामी झाडांची वाढ खुंटते
उपाय : -
मिरचीवरील या किडीच्या नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रिड ४ मी.ली किंवा थायमेथोक्झाईम ४ ग्रॅम किंवा डायमेथोएट १० मी.ली १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ( या व्यतिरिक्त मोनोक्रोटोफॉस, सायपरमेथ्रिन, असिटामीप्रिड, निम अर्क याही कीटक नाशकांचा प्रादुर्भावानुसार शिफारशीप्रमाणे वापर करावा. )
पांढरी माशी ( White Fly )
पांढरी माशी हि कीड देखील पानातील रस शोषण करते. या किडीमुळे पाने पिवळी पडतात व करपतात या किडीच्या प्रादुर्भावाणेदेखील पिकाचे व उत्पन्नाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते.
उपाय : -
पांढर्या मशीच्या नियंत्रणासाठी मिथील डिमेटॉन १० मी.ली. किंवा डायमेथोएट १० मी.ली. १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
४ ) कोळी ( Mite )
हि कीड देखील पानातील रस शोषून घेतात परिणामी पानांच्या कडा खाली वळतात. तसेच पानांचा देठ लांबतो.
उपाय : -
या किडीच्या नियंत्रणासाठी पाण्यात विरघळणारा गंधक ८० टक्के २५ ग्रॅम किंवा डायकोफॉल २० मी.ली. १० लीटर पाण्यात मिसळून फवारावे. ( या व्यतिरिक्त आबामेक्टिन १.९ टक्के (w/w) EC , बायफेणझेट २२.६ टक्के SC या कीटकनाशकांचा शिफारशीप्रमाणे लाल कोळीच्या नियंत्रणासाठी वापर करता येतो . )
५ ) मावा
हे कीटक मिरचीची कोवळी पाने आणि शेंड्यातील रस शोषण करतात. त्यामुळे नवीन पालवी येणे बंद होते.
उपाय
मिरची वरील या किडीच्या नियंत्रणासाठी लागवडिनंतर १० दिवसांनी १५ मी.ली मोणोक्रोटोफॉस ३६ टक्के प्रवाही किंवा डायमेथोएट १० मी.ली. १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
मिरचीवरील रोग
मिरची या पिकामध्ये प्रामुख्याने मर, डायबॅक, सरकोस्पोरा पानावरील ठिपके, जिवाणू जन्य पानावरील ठिपके, कोइनोफोरा करपा, भुरी रोग व विषाणू जन्य रोगाचा प्रादुर्भाव होतो. या रोगांपसून पिकाचे संरक्षण करण्यासाठी योग्य उपाय योजना केल्यास प्रभावी नियंत्रण मिळवता येऊ शकते.
१ ) मर
मर हा रोग जमिनीतील बुरशीमुळे होतो. या रोगाची लागण किंवा प्रादुर्भाव रोपवाटीकेमध्ये बिजलागवडी नंतर दुसर्या आठवड्यापासून पाचव्या आठवड्यापर्यंत आढळून येतो. लागण झालेली रोपे निस्तेज आणि कोमेजतात रोपाचा जमिनी लगतचा खोडाचा भाग आणि मुळे सडतात. त्यामुळे रोपे कोलमडतात व मारतात.
उपाय
मिरची बियाणे पेरणीपुर्वी थायरम किंवा कॅप्टन ३ ग्रॅम किंवा कार्बेन्डेझिम १ ग्रॅम किंवा ट्रायकोडर्मा ५ ग्रॅम या बुरशी नाशकांची प्रती किलोस बिजप्रक्रिया करावी. तसेच मिरची लागवडीपूर्वी जमिनीत प्रती हेक्टरी ५ किलो ट्रायकोडर्मा जमिनीत चांगल्या कुजलेल्या शेनखताबरोबर सरीतून मिसळावे. या रोगाच्या नियंत्रणासाठी मिरची लागवडीपासून दुसर्या आठवड्यात व तिसर्या आठवड्यात १० लीटर पाण्यात ३० ग्रॅम कॉपर ऑक्झिक्लोराईड ५० टक्के मिसळून या द्रावनाची वाफ्यावर किंवा झाडाच्या बुडाला ड्रिंचिंग (आळवणी ) करावी.
फळे कुजणे आणि फांद्या वाळणे ( Fruit Rot And Diebeck )
हा रोग कोरडवाहु तसेच ओळीतखालील अशा दोन्ही मिरची पिकांमध्ये आढळून येतो. हा रोग कोलिटोट्रीकम कॅपसीसी या बुरशीमुळे होतो. या रोगाचा प्रसार बियाण्याद्वारे तसेच हवेद्वारे होतो. या रोगामुळे फळावर काळपट चट्टे दिसतात. या रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या हिरव्या किंवा लाल मिरचीवर वर्तुळाकार खोलगट डाग दिसतात. दमट हवेत या रोगाचे जंतु वेगाने वाढतात. अशी फळे कुजतात व परिणामी गळून पडतात. या बुरशीमुळे झाडाच्या फांद्या शेंड्याकडून खालच्या दिशेने वाळत येतात. प्रथम कोवळे शेंडे मारतात. नुकसानग्रस्त फांदीची साल प्रथम करड्या रंगाची होऊन फांदीवर घट्ट काळ्या रंगाचे ठिपके आढळतात. पक्व झालेल्या फळांवर गोलाकार किवा अंडाकृती काळे ठिपके आढळतात. जास्त प्रादुर्भाव झाल्यास झाडे सुकून वाळतात.
उपाय
या रोगाचा प्रसार बियाण्यापासून होत असल्यामुळे मिरचीच्या रोगमुक्त बियाण्याचाच वापर करावा. तसेच लागवडीपूर्वी बियाण्याला मॅनकोझेप ३ ग्रॅम किंवा कॅप्टन ३ ग्रॅम किंवा बेनोमिल २ ग्रॅम किंवा कार्बेन्डेझिम २ ग्रॅम प्रती किलो बियान्यास चोळावे. ( बिजप्रक्रिया करावी ) ( रोपे लावत असतांना बुरशी नाशकाच्या द्रावनात बुडवून लावावे) तसेच हा रोग आढळून आल्यास मॅनकोझेप किंवा कॅप्टन किंवा कॉपर ऑक्झिक्लोराईड २५ ग्रॅम किंवा बेनोमिल किंवा कार्बेन्डेझिम किंवा प्रोपीकोनॅझोल किंवा डायफेनोकोनॅझोल १० ग्रॅम / १० लीटर पाण्यात मिसळून दर १० दिवसाच्या अंतराने ३ ते ४ वेळा फावरावे. ( एकाच औषधाचा सतत वापर करू नये ते आलटून पालटून वापरावे. )
३ ) पानावरील ठिपके ( सरकोस्पोरा )
मिरचीवर हा रोग सरकोस्पोरा व अल्टरनेरिया या बुरशीमुळे होतो. रोगाच्या सुरुवातीच्या काळात पानांवर राखाडी केंद्राचे लालसर तपकिरी कडा असलेले ठिपके उमटतात ते ठिपके कालांतराने दीड सें. मी. पर्यंत मोठे होऊन गव्हाळ्या रंगाची कडा असलेले व मध्य भागी पांढरे केंद्र असलेले होतात. हे ठिपके जास्त संख्येने पानांवर येतात आणि हळूहळू एकमेकांत मिसळून मोठे डाग तयार होतात. या रोगाचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात असल्यास पाने भरपूर प्रमाणात पिवळी पडून गळतात.
उपाय
या रोगाच्या नियंत्रणासाठी मॅनकोझेब किंवा इप्रोडीऑन २५ ग्रॅम किंवा अँँन्ट्राकॉल ३० ग्रॅम किंवा मॅनकोझेब २५ ग्रॅम १० लीटर पाण्यात मिसळून १५ दिवसाच्या अंतराने फवारावे. ( एकाच औषधाचा सतत वापर करू नये ते आलटून पालटून वापरावे. )
४ ) जिवाणूजन्य पानावरील ठिपके
मिरचीवर हा रोग झान्थोमोनस या जिवाणू मुळे होतो. रोगाचा प्रादुर्भाव ऑगस्ट ते नोव्हेंबर या महिन्यात आढळून येतो. या रोगामुळे पाने, खोड व फळांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या रोगाच्या सुरवातीला पानावर लाल करड्या रंगाचा ठिपका दिसतो व नंतर तो काळ्या मोठ्या ठिपक्यात रूपांतरित होउन ठिपक्याच्या कडा पिवळ्या होतात. या रोगाचा प्रादुर्भाव जास्त असल्यास खोडावरील ठिपके फांद्यावर पसरतात व त्यामुळे खोड व फांद्या वळतात. तसेच नुकसान ग्रस्त पाने पिवळी पडून गळतात.
उपाय
मिरची वरील जिवाणूजन्य ठिपक्यांच्या नियंत्रणासाठी १ ग्रॅम स्ट्रेपटोमायसीन + ३० ग्रॅम कॉपर ऑक्झिक्लोराईड १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पावसाळयामध्ये या रोगाच्या नियंत्रणासाठी जुलै व सप्टेंबर मध्ये दर १५ दिवसांनी याच औषधाचीदोनदा फवारणी करावी.
५ ) विषाणूजन्य रोग
मिरची वरील विषाणूजन्य रोगाचा ( तंबाखू मोझाक विषाणू, काकडी मोझाक विषाणू, बटाटा विषाणू आणि पर्णगुछ विषाणू इ. ) प्रादुर्भाव हा बियाण्याद्वारे किंवा फुलकिडे, तुडतुडे व मावा या रसशोषण करणार्या किडीमुळे होतो. या रोगामुळे पानाच्या पृष्ठाभागावर हलक्या तसेच गर्द हिरव्या रंगाचे ठिपके आढळतात. परिणामी पाने काठाने गुंडाळतात व झाडाची वाढ खुंटते. पानाचा आकारात बदल होतो. तसेच फुलांची निर्मिती बंद होते.
उपाय
मिरचीवर या रोगाचा प्रादुर्भाव दिसताच रोगग्रस्त झाडे मुळासकट उपटून टाकावीत व जाळून नष्ट करावीत. जेणेकरून या रोगाचा प्रसार व प्रादुर्भाव संपूर्ण पिकामध्ये होणार नाही तसेच रस शोषण करणार्या किडीच्या नियंत्रणासाठी गरजेनुसार व शिफारशी प्रमाणे एसिफेट १० ग्रॅम किंवा फिप्रोनिल २० मी. ली. प्रती १० लीटर पाण्यात मिसळून मिरचीवर फवारणी करावी. मिरची पिकच्या कडेने दोन - तीन ओळींन मध्ये मक्का लावावी. तसेच पीक तनमुक्त ठेवावे.
crossorigin="anonymous">
style="display:block; text-align:center;"
data-ad-layout="in-article"
data-ad-format="fluid"
data-ad-client="ca-pub-9904937471916771"
data-ad-slot="8739468014">
६ ) भुरी ( Powdery Mildew )
भुरी हा रोग लेव्हेलुला टावरिका या बुर्शीमुळे होतो. पानाच्या वरच्या बाजूला वेग वेगळ्या तीव्रतेची व आकाराचे पिवळे ठिपके दिसणे ही या रोगाची सुरवातीची लक्षणे आहेत. पानाच्या खालच्या बाजूला पांढरी पावडर आढळते. या रोगाचे प्रमाण वाढल्यास पानाचा रोगग्रस्त भाग आकसतो व पाने गळतात. खोड आणि फळांना क्वचितच या रोगाची लागण होते.
उपाय
मिरची वर या रोगाची लक्षणे दिसताच डिनोकॅप किंवा ट्रायडेमॉर्फ किंवा कार्बेन्डेझिम १० मि. ली./ग्रॅम किंवा ट्रायडिमेफॉन किंवा पॅन्कोनाझोल किंवा मायकोबुटानील ५ ते १० ग्रॅम/ मि. ली. प्रती १० लीटर पाण्यात मिसळून फवारावे. ( लागवड करत असतांना मिरचीचे रोगप्रतिकारक तसेच सुधारित बियाणे वापरावे.)
( विनंती :- शेतकरी बांधवांनो तुमचे प्रश्न किंवा माहिती तुमच्या कडे असतील तर कमेंट बॉक्स मध्ये टाईप जरूर करा जेणे करून ईतर शेतकरी बांधवांना त्या महितीचा फायदा होईल. आणि हो हि पोस्ट शेअर जरूर करा )
छान छान
धन्यवाद
Nakki share kara
भुरी साठी score वापरले तर चालेल का
हो score 10 ml + kavach 15 Gm वापरा भूरी करपा कमी होईल
कोवळी मिरची काही ठिकाबी करपत आहे.
उपाय सांगा
score 10 ml + kavach 15 Gm सिलिकोन बेस स्टिकर वापरा भूरी करपा कमी होईल