कांदा लागवड
सुधारित पद्धतीने कांदा लागवड, खरीप कांदा लागवड, रब्बी कांदा लागवड
शेतकरी बांधवांनो कांदा लागवडी खालील क्षेत्राच्या बाबतीत भारत हा प्रथम क्रमांकावर आणि उत्पादनाच्या बाबतीत दुसर्या क्रमांकावर आहे. भारत हा कांदा उत्पादनात कमी असण्या मागच्या बर्याचश्या करणांमध्ये या पिकावर पडणार्या अनेक किडी व रोगांचा प्रादुर्भाव हे प्रमुख कारण आहे. रोपे लागवडीपासून ते कांदा साठवणुकीपर्यंत वेगवेगळ्या रोगांची झळ या पिकाला सहन करावी लागते. या अडचणींमुळे उत्पादनाचा दर्जा खलावतो परिनामी उत्पादन कमी मिळते. या पिकावरील कीड व रोगांचे अपुरे ज्ञान तसेच रोग नियंत्रणात आणण्यासाठी झालेला जास्तीचा खर्च यामुळे देखील कांदा शेती तोट्यात जाते. त्यामुळे कीड व रोगांची माहिती असणे आवश्यक असते. रोगाची लक्षणे दिसताच उपाययोजना करून रोग व कीड आर्थिक नुकसानी होण्या आधी आटोक्यात आणता येते. व उत्पन्नात वाढ होते.
कांदा लागवडीचे हंगाम
कांदा लागवड ही साधारणतः खरीप हंगामामध्ये जुलै व ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात तसेच रांगडा ऑक्टोंबर व नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात आणि रब्बी डिसेंबर व जानेवारी च्या पहिल्या आठवड्यात या तीनही हंगामात केली जाते.
कांदा लागवडीसाठी जमीन
कांदा पिकाच्या लागवडीसाठी जमिनीची निवड करत असतांना मध्यम हलकी तसेच पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी. याच बरोबर एकाच क्षेत्रावर सतत कांदा पिकाची लागवड करू नये. यासाठी योग्य पिकांची फेरपालट करून उत्पादन घ्यावे. यामागील कारण म्हणजे बर्याचश्या बुरशीजन्य रोगांचे रोग पसरविनारे जंतु हे जमिनीत वास्तव्य करतात. या जंतूंच्या नियंत्रणासाठी उन्हाळ्यामध्ये ( एप्रिल ते मे ) जमिनीची नांगरणी करीत असतांना एक फुटा पर्यन्त खोलवर करून घ्यावी व जमीन चांगली तापू द्यावी यानंतर कुळवाच्या सहाय्याने दोन तीन पाळया देऊन मोठी ढेकळे फोडून जमिन भुसभुशीत करावी. शेतामधील पूर्वीच्या पिकाचे अवशेष तसेच तणे गोळा करून नष्ट करावीत. जमिनीचा पोत सुधारण्यासाठी तसेच सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण वाढण्यासाठी शेतामध्ये शेणखत तसेच ट्रायकोडर्माचा वापर करावा. यामध्ये वापर करत असतांना प्रती हेक्टरी ५ ते १० किलो ट्रायकोडर्मा याबरोबर १०० ते २०० किलो चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळून द्यावेत
बियाण्याची निवड व बिजप्रक्रिया
कांदा पिकाची लागवड करत असतांना चांगली उगवण क्षमता असलेल्या तसेच सुधारित व रोगप्रतिकारक जातींचा हंगामानुसार वापर करावा. बियाणे खात्री करूनच खरेदी करावे. पेरणी करण्यापूर्वी प्रती किलो बीयाण्यास २ ते ३ ग्रॅम कार्बेन्डेझीम किंवा थायरम किंवा कॅप्टन किंवा बावीस्टीन याची बिजप्रक्रिया करावी. तसेच रोप तयार झाल्यावर रोपांची शेतामध्ये लागवड करत असतांना कार्बेन्डेझीम किंवा बावीस्टीन १० ग्रॅम १० लीटर पाण्याचे द्रावण तयार करून त्यामध्ये मुळया बुडवून रोपांची लागवड करावी. बिजप्रक्रिया व बुरशी नाशकाच्या द्रावनामध्ये मुळया बुडवून लावल्यास मुळकुज व रोपांची मर रोखली जाते. व रोगमुक्त रोपांची चांगल्या प्रकारे वाढ होण्यास मदत होते.
खत व्यवस्थापन
अनेक पिकांमध्ये चुकीच्या खतांचा वापर केल्यामुळे रोगांचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे कांद्याच्या पिकासाठी हंगामानुसार शिफारस केलेल्या खतांची मात्रा वापरावी यामध्ये खरीपातील लागवडीसाठी हेक्टरी नत्र १०० किलो, स्फुरद ५० किलो,पालाश ५० किलो तसेच गंधक ५० किलो त्याचप्रकारे रांगडा यासाठि हेक्टरी नत्र १५० किलो, स्फुरद ५० किलो, पालाश ५० किलो तसेच गंधक ५० किलो व रब्बी साठी हेक्टरी नत्र १५० किलो, स्फुरद ५० किलो,पालाश ८० किलो व गंधक ५० किलो याप्रमाणात वापरावे. वरील खतांची मात्रा वापरत असतांना ५० टक्के नत्र १०० टक्के स्फुरद , १०० टक्के पालाश व १०० टके गंधक लागवडीपूर्वी ( लागवड करतांना ) वापरावे. कांद्याची लागवड केल्यानंतर या पिकाला २ महिन्यापर्यंत नत्राची आवश्यकता असते. म्हणून उरलेले ५० टक्के नत्र २ ते ३ हप्त्यांमध्ये विभागून पाणी देण्याच्या अगोदर पिकाला द्यावे. नत्राचा वापर कांदा लागवडीनंतर ६० दिवसांच्या आतच द्यावा. ६० दिवसांच्या नंतर नत्राचा किंवा नत्रयुक्त खताचा वापर करू नये. वापर केल्यास जोड कांदे येणे, साठवणुकीत कांदा सडणे याच बरोबर बुरशीजन्य रोग म्हणजेच करपा इ. रोगांचा प्रादुर्भाव होतो.
कांद्या मध्ये इतर खतांची आवश्यकता व कार्य
१ ) स्फुरद , पालाश व गंधक
स्फुरद हे पिकाच्या मुळांच्या वाढीसाठी आवश्यक असते. त्याचप्रकारे पालाशमुळे पिकाच्या पेशींना काटकपणा येतो. व कांद्याचा टिकाऊपणा वाढतो, आकर्षक रंग येतो. याच बरोबर पिकाची रोगप्रतिकार शक्ति वाढते. गंधकामुळे देखील कांद्याच्या साठवणूक क्षमतेमध्ये वाढ होते.
२ ) सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता
इतर पिकांना जशी सूक्ष्म अन्नद्रव्याची गरज असते त्याचप्रकारे कांद्याला देखील गरज भासते. कांदा पिकाला लोह, तांबे, मॅगनीज, जस्त व बोरॉन या सूक्ष्म अन्नद्रव्यांची आवश्यकता असते. कांद्यामध्ये काही सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता झाल्यास त्यांचा परिणाम पातीवर तसेच कांद्यावर दिसून येतो. उदा.. तांब्याच्या कमतरतेमुळे कांदे कडक न राहता मऊ पडतात तसेच कांद्याचा वरील पापुद्रा ठिसुळ व फिकट पिवळा पडतो व गळून जातो. याच बरोबर बोरॉनच्या कमतरतेमुळे पात करड्या रंगाची तसेच नीळसर होते कोवळ्या पातीवर हिरव्या तसेच पिवळ्या रंगाचे डाग दिसतात. कांद्याची पात कडक आणि ठिसुळ होते. रोपांची वाढदेखील खुंटते. झिंकची कमी झाल्यास पात जाड होणे खालच्या बाजूने वाकणे इ लक्षणे दिसतात.
३ ) सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर
कांद्यावर सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता भरून काढण्यासाठी सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर जमिनीतून कारायचा झाल्यास ती लागवडीनंतर ३० ते ४५ दिवसांपर्यंत द्यावे. तसेच फवारणीसाठी ४५ दिवसांनी एकदा व ६० दिवसांनी दुसर्यांदा द्यावे. सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे जानवल्यास किंवा ओळख आणि खात्री पटल्यानंतर त्या अन्नद्रव्यांची कमतरता भरून काढण्यासाठी त्या अन्नद्रव्यांची सल्फेटच्या स्वरुपात फवारणी केली तरी चालते. उदा. झिंक सल्फेट मॅगनीज सल्फेट, कॉपर सल्फेट ०.१ टक्के, फेरस सल्फेट ०.२५ टक्के, या प्रमाणात फवारणी करावी ( ०.१ टक्के म्हणजे १ ग्रॅम पावडर १ लीटर पाण्यात )
कांद्यावरील किड व रोग
कांदा या पिकावर फुलकिडे तसेच जमिनीतील आळी या किडींचा तर मर, जांभळा करपा, काळा करपा व तपकिरी करपा या रोगांचा प्रादुर्भाव आढळून येतो.
कंदयावरील कीड
फुलकिडे
फुलकिडे हे कांद्याच्या पातीमधील खरवडून रस शोषतात त्यामुळे पात वाकडी होते या किडीने रस शोषण्यासाठी खरवडलेल्या जागेमधून करपा रोगाच्या जंतुंची लागण होऊन करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढतो. तसेच या कीडिमुळे पातीवर पांढरे चट्टे पडतात.
फावरणी / उपाय
या कीडीच्या नियंत्रणासाठी मिथाइल डेमेटॉन १० मी.ली किंवा सायपरमेथ्रिन ५ मी .ली. किंवा कार्बोसल्फान १० मी .ली. प्रती १० लीटर पाण्यात मिसळून १५ दिवसाच्या अंतराने फवारण्या कराव्या. या व्यतिरिक्त डेल्टामेथ्रिन + ट्रायझोफॉस १० मी . ली. १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
कांद्यामधील आळि
कांद्यामध्ये या आळिचा प्रादुर्भाव सुरूवातीला कांदा लहान असतांना आढळून येतो. ही आळि जमिनीमध्ये राहून कांद्याचे बुड खाते. यामुळे बर्याच प्रमाणात पिकाचे नुकसान होते.
फवारणी / उपाय
कांदा लागवड करत असतांना एकरी ३ ते ४ किलो फोरेट ( थायमिट ) खतामध्ये मिसळून टाकावे तसेच कांद्यामध्ये या आळिचा प्रादुर्भाव आढळल्यास क्लोरोपायरीफॉस १० मी ली प्रती १० लीटर पाण्यात मिसळून कांद्याच्या सरीमध्ये आळवणी ( ड्रिंचिंग ) करावी. याच बरोबर अंतरप्रवही कीटकनाशकांची फवारणी करावी.
कांद्यामधील रोग
कांद्यामधील मर
कांदा या पिकामध्ये फ्यूजारियम या बुरशीमुळे मर या रोगाची लागण होते. या रोगाची लागण टाकलेल्या रोपामध्ये तसेच लागवडीनंतर शेतामध्ये आढळून येते. या रोगामुळे ८० ते ९० टक्के नुकसान होऊ शकते. या रोगाची लागण झाल्यावर रोपे पिवळी पडतात. तसेच जमिनी लगतच्या रोपांचा भाग मऊ पडतो. व रोपे कोलमडुन सुकतात. कोलमडलेल्या रोपांच्या जमिनीलगत असलेल्या भागावर पांढर्या बुरशीची वाढ होते. दुसर्या वर्षी त्याच जागेवर रोपांची लागवड केल्यास मर रोगाचा जास्त प्रादुर्भाव होतो.
फावरणी / उपाय
कांद्याचे रोप किंवा कांदा लागवड ही मध्यम ते उत्तम निचरा होणार्या जमिनीतच करावी. त्याचबरोबर थायरम ३ ग्रॅम किंवा कार्बोक्सिन २ ते ३ ग्रॅम किंवा ट्रायकोडर्मा ५ ग्रॅम प्रती किलो बियाणे या प्रमानात बियाण्याची बीजप्रक्रिया करून घ्यावी. येवढे करून देखील या रोगाचा प्रादुर्भाव आढळल्यास कॅप्टन ३० ग्रॅम प्रती १० लीटर पाण्यात मिसळून दोन रोपांच्या ओळीमध्ये ड्रिंचिंग ( आळवणी ) करावी. व हलके पाणी द्यावे
जांभळा करपा ( अल्टरनेरिया करपा )
कांद्यावर हा रोग अल्टरनेरिया पोरी अ. शेपूलीकोला या बुरशीमुळे होतो. हा रोग पिकाच्या कोणत्याही अवस्थेत येतो. या रोगामुळे पातीवर सुरुवातीला लहान, खोलगट, पांढरट चट्टे पडतात. या चट्ट्यांचा मधला भाग जांभळट लालसर होतो. व कडा पिवळसर दिसतात. या रोगाची सुरुवात शेंड्याकडून होऊन पातीच्या खालच्या भागाकडे पसरत जाते. या रोगाचे प्रमाण वाढल्यास पात शेंड्याकडून जळू लागते, व नंतर संपूर्ण पात जळाल्यासारखी दिसते. कांदा लागवडीनंतर सुरुवातीच्या काळामध्ये या रोगाची लागण झाल्यास पात जाळून जाते परिणामी पिकाची वाढ चांगली होत नाही. याचबरोबर पिकाची वाढ न झाल्यामुळे कांदा चांगला पोसत नाही परिणामी चिंगळी कांद्याचे प्रमाण वाढते. हा रोग कांदा पोसण्याच्यावेळी झाला तर रोग हा कांद्यापर्यंत पसरतो. परिणामी कांदा सडतो.
फवारणी / उपाय
लागवडीनंतर १५ दिवसाच्या अंतराने मॅन्कोझेब २५ ग्रॅम किंवा कार्बेन्डेझिम १० ग्रॅम किंवा कॅप्टन १० ग्रॅम प्रती १० लीटर पाण्यात मिसळून आलटून पालटून ३ वेळा फवारणी करावी तसेच लागवड करत असतांना बुरशीनाशकांच्या द्रावनामध्ये मुळया बुडवून लागवड करावी. नत्रयुक्त खतांचा जास्त किंवा उशिरा वापर करू नये.
काळा करपा
या रोगाचा प्रादुर्भाव कोलिटोट्रीकम या बुरशीमुळे होतो. या रोगाच्या प्रादुर्भावामुळे सुरूवातीला पातीवर गोलाकार काळे डाग पडतात. ठिपक्यांचे प्रमाण वाढल्यामुळे पात काळी पडून वाळते व नंतर रोपे मरतात.
फवारणी / उपाय
या रोगाचा प्रादुर्भाव आढळताच मॅन्कोझेब २५ ग्रॅम किंवा टिब्युकोनॅझोल १० मी.ली. प्रती १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
तपकिरी करपा
या रोगाचा प्रादुर्भाव स्टेम्फिलियम व्हेसीकारिअम या बुरशीमुळे होते. या बुरशीमुळे तपकिरी रंगाचे लांबट चट्टे पातीच्या बाहेरील भागावर दिसून येतात. चट्ट्यांचा आकार वाढत जाऊन पात सुकु लागते व जळाल्यासारखी दिसते.
फवारणी / उपाय
या रोगांच्या नियंत्रणासाठी रोप लागवडीनंतर १५ दिवसांच्या अंतराने मॅन्कोझेब किंवा हेक्झकोनॅझोल किंवा प्रोपीकोनॅझोल या बुरशीनाशकांच्या शिफारशी नुसार आलटून पालटून ३ ते ४ फवारण्या कराव्यात.
My dear friends share this post